Ad will apear here
Next
स्मिता पाटील, तात्यासाहेब कोरे
छोट्या कारकिर्दीत आपल्या चतुरस्र अभिनयाने जगभर नाव कमावलेली अभिनेत्री स्मिता पाटील आणि मुरबाड माळातून नंदनवन उभारणारे सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांचा १३ डिसेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय... 
..........
स्मिता पाटील :
१७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुण्यात स्मिता पाटील यांचा जन्म झाला. रूपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांचं भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्त्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं, की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रूढ संकल्पना दुय्यम ठरल्या. 

स्मिता एका राजकीय घराण्यातून पुढे आलेली मुलगी होती. तिचे वडील शिवाजीराव पाटील हे सहकार क्षेत्रातील अग्रणी नेते व माजी मंत्री होते. आई विद्याताई ह्यासुद्धा सामाजिक कार्याशी जोडल्या गेल्या होत्या. स्मिता पाटील यांचे शालेय शिक्षण पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेत शिक्षण झाले. राष्ट्रसेवा दलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिता पाटील यांनी प्रारंभीच्या काळात मुंबई दूरदर्शन येथे वृत्तनिवेदिका म्हणून काम केले. त्यानंतर पुणे येथील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’मधून त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. 

राष्ट्रसेवा दलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील ‘बातमीदार’ या नात्याने केली. चित्रपटसृष्टीत येण्याआधी तिने फोटोग्राफीमध्येसुद्धा नाव कमावले होते. छोट्या पडद्यावरील भूमिकेवरून तिचे सुप्त गुण हेरून श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने तिला ‘निशांत’ आणि ‘चरणदास चोर’ या चित्रपटांत अभिनयाची संधी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या ‘मंथन’ आणि ‘भूमिका’ या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. 

‘मंथन’मधून स्मिता पाटील यांनी सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला. त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित ‘भूमिका’मधून त्यांनी पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणाऱ्या स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या. वयाच्या २१व्या वर्षी ‘भूमिका’ सिनेमातील संवेदनशील अभिनयासाठी स्मिता पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. वास्तविक हिंदी चित्रपटांमधून प्रामुख्याने पारंपारिक स्त्री प्रतिमाच चितारल्या गेल्या. तरीही स्मिता पाटीलच्या उदयापूर्वी वहिदा रेहमान, नूतन, सुचित्रा सेन यांनी या चाकोरीपलीकडल्या काही प्रतिमा उभ्या केल्या. स्मिता पाटील यांनी ही धारा आपल्या अभिनयसामर्थ्याने दृढ केली आणि पुढेही नेली. दलित, शोषित स्त्रियांच्या, बंडखोर स्त्रियांच्या, आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या. 

या बाबतीत शबाना आझमी या तिच्या समकालीन अभिनेत्रीनेही योगदान केलं आहे. या अभिनेत्रींनी प्रेयसीच्या रूढ झालेल्या प्रतिमांना पर्यायी अशा प्रतिमा सक्षमतेने आविष्कृत केल्या. वेगळ्या मूल्यचौकटी व निष्ठा घेऊन जगणाऱ्या अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रींनी एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली. स्मिता पाटील यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊनही सन्मानित केले होते. स्मिता पाटील यांना विशेषत: आर्ट सिनेमांसाठी ओळखले जात होते. परंतु कमर्शिअल सिनेमांतसुद्धा त्यांनी झेंडा रोवला होता. अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिने ‘नमक हलाल’ आणि ‘शक्ती’सारखे सुपरहिट सिनेमे दिले होते. सुपरस्टार राजेश खन्नासोबतसुद्धा स्मिताने सहा सुपरहिट सिनेमे केले होते. 

आपल्या छोट्याशा करिअरच्या काळात तिने जवळपास ८०हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले. त्यात ‘निशान्त’, ‘चक्र’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘गमन’, ‘आक्रोश’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘अर्थ’, ‘बाज़ार’, ‘मंडी’, ‘मिर्च मसाला’, ‘अर्धसत्य’, ‘शक्ति’, ‘नमक हलाल’, ‘अनोखा रिश्ता’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. स्मिता पाटीलचे १४ सिनेमे तिच्या निधनानंतर रिलीज झाले. त्यामध्ये ‘मिर्च मसाला’, ‘डांस-डांस’, ‘ठिकाना’, ‘सूत्रधार’, ‘इन्सानियत के दुश्मन’, ‘अहसान’, ‘राही’, नजराना’, ‘आवाम’, ‘शेर शिवाजी’, ‘वारिस’, ‘हम फरिश्ते नही’, ‘आकर्षण’ आणि ‘गलियो के बादशाह’ हे सिनेमे आहेत. 
स्मिता पाटीलच्या निधनानंतर मॉस्को, न्यूयॉर्क, फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये तिच्या चित्रपटांचं ‘सिंहावलोकन ‘ झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ती पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली. 

स्मिता पाटील यांचे वैयक्तिक आयुष्य तसे फार चर्चेत राहिले. विवाहित असलेल्या राज बब्बरसोबत त्या लिव्ह इनमध्ये राहत होत्या. त्यामुळे त्यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. राज बब्बर यांचे नादिरा बब्बरसोबत लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुलेही होती. स्मिता यांच्यावर पुस्तक लिहिणाऱ्या मैथिली राव यांनी पुस्तकात लिहिले आहे, की स्मिता पाटील यांची आई राज बब्बर यांच्याशी संबंधाच्या विरोधात होती. स्मिताने कोणाचे घर तोडू नये अशी त्यांची इच्छा होती; पण स्मिता यांनी आईचे न ऐकता राज यांच्यासोबत विवाह केला. मुलगा प्रतीकच्या जन्मानंतर काही तासांतच तिचा मृत्यू झाला. ती तारीख होती १३ डिसेंबर १९८६. 
 .......

तात्यासाहेब कोरे :
१७ ऑक्टोबर १९१४ रोजी कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे तात्यासाहेबांचा जन्म झाला. १९३९मध्ये कोल्हापूरला स्थापन झालेल्या प्रजापरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यारंभ केला. स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले होते. प्रतिसरकारच्या भूमिगत क्रांतिकारांना त्यांनी आश्रय दिला. 

वारणेकाठी सहकारी तत्त्वावर त्यांनी साखर कारखाना उभारला आणि त्या परिसराचे नंदनवनात रूपांतर करणे हेच आपले जीवितकार्य मानले; ते साकार करून दाखविलेही! वारणा बालवाद्यवृंदापासून ते इंजिनीअरिंग महाविद्यालयापर्यंत आणि वारणा बझारपासून ते वारणा औद्योगिक वसाहतीपर्यंत विधायक कामांचे डोंगर त्यांनी उभे केले. उजाड माळरानावर हरितक्रांती साकारली. वारणा कागदापासून वारणा श्रीखंडापर्यंत मजल मारली. हा सारा प्रताप तात्यासाहेबांच्या दूरदृष्टीचा! 
‘अवघे जन मेळवावे, एक विचारे भारावे’ हे ध्येय ठेवून त्यांनी वाटचाल केली. सहकाराच्या माध्यमातून परिसराचा सर्वांगीण विकास साधणारा हा हाडाचा कार्यकर्ता! अवघ्या देशाला आदर्शवत वाटावे असे कार्य तात्यासाहेबांनी केले. सहकाराला सुगंध दिला. तात्यासाहेब कोरे यांचे १३ डिसेंबर १९९४ रोजी निधन झाले. 

(माहिती संकलन : संजीव वेलणकर)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZRCCH
Similar Posts
दि. बा. मोकाशी, गणेश मावळणकर, बप्पी लाहिरी ज्येष्ठ लेखक दि. बा. मोकाशी, पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश मावळणकर आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचा २७ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय
मनोहर पर्रीकर, प्रतिभाताई पवार, पांडुरंग नाईक गोव्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले नेते आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा, तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आणि चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांचा १३ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
शरद जोशी शेतकरी नेते शरद जोशी यांचा १२ डिसेंबर हा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय....
शरद पवार, गोपीनाथ मुंडे, रजनीकांत, एन. दत्ता, खेमचंद प्रकाश, भरत जाधव ज्येष्ठ नेते शरद पवार, लोकनेते गोपीनाथ मुंडे, दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत, लोकप्रिय संगीतकार एन. दत्ता, खेमचंद प्रकाश आणि मराठी सुपरस्टार भरत जाधव यांचा १२ डिसेंबर हा जन्मदिन....त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language